घरी राहुन कसे व काय काम कराल… ?
Category : Blog , Front Page
घरी राहा व घरूनच काम करा ...
सध्या अवघ्या जगासमोरच कोरोना व्हायरसचे संकट असून आपला देशही त्याला अपवाद राहिलेला नाही. वेगाने फैलावणार्या या विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय आहे. सध्या आपल्या देशातही 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे आणि या काळात अनेक लोक घरी बसूनच ऑफिसचे काम करीत आहेत. या ‘वर्क फ्रॉम होम’ मुळेही अनेकजण मेटाकुटीला आले आहेत व त्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये ऑफिसपेक्षा घरचे कॉम्प्युटर, लॅपटॉप स्लो असणे, वारंवार इंटरनेट कनेक्शन जाणे, घरात सगळेच असताना व विशेषतः लहान मुलांच्या दंग्यात काम करताना अडचण येणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर खालील माहिती आपणास उपयुक्त ठरेल.
एक जागा तयार करा
ऑफिससारखी स्पेस, ते वातावरण घरी बसून मिळणं शक्य नाही, याची सर्वांनाच जाणीव आहे; मात्र कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपण घरातच स्वतःची अशी ‘स्पेस’ तयार करू शकतो. ही जागा निश्चित केल्यावर तिथे बसून काम करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ही जागा बेडपासून दूर असू द्या अन्यथा काम करताना आराम करण्याचा मोह आवरणार नाही.
टार्गेट तयार करा
कामाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या कामाचे एक टार्गेट तयार करा. तुम्हाला सुरुवातीला काय करायचे आहे, कोणते काम वेळखाऊ आहे आणि कोणते काम पटकन होऊ शकते याची यादी तयार करून काम करा. कामाचे वेळापत्रक तयार करा. इंटरनेट कनेक्शन वगैरे गोष्टी गृहित धरूनच त्याची आखणी करा.
अधूनमधून ब्रेक घ्या
एकाच जागी दीर्घकाळ बसू नका. ऑफिसची सिटिंग अरेंजमेंट पूर्णपणे वेगळी असते. तशी सिटिंग अरेंजमेंट घरी नसल्याने फार काळ एकाच जागी बसता येत नाही. त्यामुळे अधूनमधून पाच मिनिटांचा ब्रेक घ्या, रिलॅक्स होऊन कामाला सुरुवात करा.
आपल्या सहकार्यांच्या संपर्कात राहा
दररोज सहकार्यांच्या संपर्कात राहा. किमान पाच मिनिटे त्यांच्याशी संवाद साधा. त्यामुळे तुम्हाला काम करताना सोपे होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. घरात बसण्याचा कंटाळाही येणार नाही.
कुटुंबीयांना विश्वासात घ्या
घरीच असलो तरी आपण ऑफिसचे, महत्त्वाचे काम करीत आहोत, याची सौम्यपणे कुटुंबीयांना विशेषतः लहान मुलांना जाणीव करून द्या. त्यामुळे ते तुमच्या कामाच्या वेळेत व्यत्यय आणणार नाहीत, तरीही आपण ऑफिसमध्ये नसून घरीच आहोत व त्याच्या काही मर्यादाही आहेत, याची जाणीव असू द्या.
आपल्या आरोग्याची काळजी घ्या
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या. दररोज घरी योगासने किंवा अन्य योग्य व्यायाम करा. पोषक आहार घ्या आणि स्वतःला व इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
सर्वात महत्वाचे
दैनंदिन जीवनात बहुतेकदा आपले छंद अथवा काही शिकण्याची आवड राहुन गेलेली असते... हीच ती योग्य वेळ आहे त्याचा सदुपयोग करा. आज सोशल मिडिया मार्फत बहुतेक गोष्टी आपणास अतिशय सोप्या भाषेत शिकण्यास मिळतात - त्या शिका, आपले कम्युनिकेशन स्किल्स वाढवा, ई-मेल/पत्रव्यवहार करण्याची कला शिका, बँक / ऑनलाईन व्यवहार स्वतः शिका व आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीस शिकवा. या २१ दिवसात कदाचीत आपल्या जोपासलेल्या छंदातून, कले मधुन आपणास नवीन व्यवसाय, जोड धंदा वा जगण्याचा नवीन मार्ग सापडेल.
काही ठरावीक मुद्दे घेण्याचा प्रयत्न केला आहे, हि पोस्ट आपणास उपयुक्त वाटल्यास आपल्या सहकार्यांना देखील शेयर करा.
कमेंट्स मध्ये आपण आपले विचार मांडु शकता ...
घरी राहुन समजाप्रति आपले कर्तव्य पार पाडत आहात त्या बद्दल धन्यवाद.